मुंबई,
ministry-identity-cards-missing : मंत्रालयात प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीत मोठी त्रुटी समोर आली आहे. सुमारे १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याचे उघड झाले असून, यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. नियमांनुसार मंत्रालयात काम आटोपल्यानंतर ही ओळखपत्रे जमा करणे बंधनकारक असते, मात्र अनेकांनी ती घरी नेल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
राज्याच्या विविध भागांतून दररोज मोठ्या संख्येने नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यांना जलद व सोपा प्रवेश मिळावा यासाठी डिजिटल पद्धतीने ओळखपत्रे दिली जातात. मात्र, काही नागरिकांनी ही कार्डे परत न केल्यामुळे आता प्रशासनाला त्यांचा मागोवा घ्यावा लागत आहे.
यासाठी कंत्राटदार कंपनीने संगणकीय नोंदींच्या आधारे संबंधित अभ्यागतांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. फोनद्वारे त्यांना ओळखपत्र परत करण्याचे आवाहन केले जात असून, या मोहिमेला नागरिकांकडूनही काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे ३०० ओळखपत्रे परत मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. ज्या नागरिकांकडे जुनी ओळखपत्रे राहिली आहेत, त्यांना ती जमा केल्याशिवाय यापुढे मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक कार्डाचे ट्रॅकिंग सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.