गोंदिया,
mission-lakshadhe : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मिशन लक्षवेध योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. मिशन लक्षवेध योजना या माध्यमातून ऑलम्पीक स्तरावर खेळल्या जाणार्या १२ खेळ प्रकारामध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे महाराष्ट्र शासनाचे मानस आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

राज्यातील खेळ व खेळाडू, क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धेचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार खेळाडूंना करिअर मार्गदर्शन, खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशीविदेशी संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित करणे आहे. सदर योजना ही जिल्हास्तरीय असून राज्यस्तरावर हाय परफॉरमन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र राबविण्यात येणार आहे. मिशन लक्षवेध योजनेतून गोंदिया जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामार्फत मैदानी व टेबल टेनिस असे २ क्रीडा प्रकारामधून प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातून मैदानी व टेबल टेनिस या खेळाकरीता निवड चाचणीचे आयोजन करणे प्रस्तावित असल्याची माहिती क्रीडा विभागाकडून देण्यात आली आहे. तरी पात्र खेळाडूंनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह विहीत नमुन्यात ऑफलाईन स्वरूपात ६ एप्रिलपर्यंत प्रत्यक्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी यांनी केले आहे.