हिंगणघाट,
molestation-case : तालुक्यातील कान्हापूर नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शाळेतील महिला मदतनीसाचा वारंवार विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला या जिल्हा परिषद शाळेत मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवणे व वाटप करण्याचे काम करतात. शाळेत सतीश लांबे हे २०१८ पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या एका महिन्यापासून शिक्षक सतीश लांबे हे तिच्याशी वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होते. यामध्ये तिचा हात पकडणे, कवटाळण्याचा प्रयत्न करणे आणि जबरदस्तीने विनयभंग करणे, असे प्रकार घडत होते. २७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास शाळेत खिचडी बनवित असताना शिक्षकाने महिलेचा हात पकडून तिला कवटाळले तसेच अश्लील मागणी केली. त्यावेळी विद्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात उपस्थित होते. महिलेने विरोध करून स्वतःची सुटका करून घेतली व घरी जाऊन पतीला सर्व प्रकार सांगितला.
सदर प्रकारामुळे बदनामी होईल, या भीतीने महिला काही दिवस शांत राहिली. मात्र, शिक्षकाची हिंमत वाढत असल्याने अखेर तिने पतीसह हिंगणघाट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.