छ.संभाजीनगर,
Mridangam player's wife commits suicide छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहित महिलेच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली असून, कौटुंबिक छळ आणि पतीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे ती गंभीर मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. रांजणगाव परिसरात राहणाऱ्या काजल हिने १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास राहत्या घरी आपले जीवन संपवले. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. काजलचा विवाह २५ मार्च २०२५ रोजी मृदंग वादन करणारे म्हणून ओळख असलेल्या अमोल लघाणे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र काही महिन्यांनी पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय निर्माण झाला.
या कारणावरून काजलला सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता, असा आरोप तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, पतीकडून वारंवार अपमानास्पद वर्तन, धमक्या आणि मारहाणीच्या घटना घडत होत्या. काजलने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर काजलच्या कुटुंबीयांनी पतीवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.