गोंदिया,
bangaon-water-supply-scheme : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांतील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचे विद्युत देयके थकल्याने महावितरणने या योजनेचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे या ३६ गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामाना करावा लागत आहे. दरम्यान, योजनेंतर्गत सदर वीज देयक भरण्यात आले असून महावितरणतर्फे १ एप्रिल रोजी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांनी बनगाव पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत बनगाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. दरम्यान, या योजनेचे दरमहा सुमारे सहा लाख रुपयांचे वीज बिल येत असताना नळजोडणीधारकांकडून केवळ एक लाख रुपयांच्या आसपास पाणीपट्टी वसूल होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नगर परिषदेवर एकूण ४६ लाख रुपयांच्या वरची थकबाकी साचली असल्याची माहिती आहे. अशावेळी वीज देखके भरण्यात न आल्याने वीज वितरण कंपनीने सदर योजनेचा १७ फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेच्या माध्यमातून ३६ गावांवर १ कोटी ६१ लाख ५३ हजार ११७ रुपये थकीत आहेत. त्यात आमगाव तालुक्यातील २५ गावांवर ९४ लाख ५९ हजार ४४९ रुपये थकले असताना सालेकसा तालुक्यातील ४ गावांवर २१ लाख ६ हजार ८९७ रुपये थकले आहेत. तर आमगाव नगर परिषदेवर ४६ लाख ९ हजार ७०५ रुपयांचे बिल थकीत आहे. दरम्यान, योजनेंतर्गत १ एप्रिलला थकीत वीज देयक भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला असून येत्या दोन ते तीन दिवसात पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती येथील अभियंता सतदेवे यांनी दिली आहे.