नागपूर,
prakash-abitkar : आरोग्य यंत्रणा व लोकसहभागातून अधिक सशक्त व निरोगी महाराष्ट्र घडवू, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी आज येथे केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राज्य शासनाने हाती घेतले असून या अंतर्गत मिहानमधील एम्स सभागृहात जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाèयांसाठी कार्यशाळा आज घेण्यात आली. तिचे उद््घाटन आबीटकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासह राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, सार्वजनिक आरोग्य प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव इ. रवींद्रन, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कांदेवाड, नागपूर व गोंदिया जि.प.चे सीईओ अनुक्रमे विनायक महामुनी, मुरुंगनाथम एम. तसेच डॉ. राजीव पोतदार व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रकाश आबीटकर म्हणाले की, आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. त्या गावपातळीपर्यंत भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठीच्या मोलाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक असून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी. आरोग्यसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासोबतच हे अभियान यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलेे.
राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्यविषयक उपक्रम राबविणे गरजेचे होते. या अनुषंगाने हे अभियान आहे. शालेय शिक्षणात आरोग्याचा धडा देणे गरजेचे आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून काम केले पाहिजे. सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा काहीही मोठे नाही. स्वच्छता महत्त्वाची असून प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून काम केले पाहिजे.
आरोग्य प्रधान सचिव डॉ. विनायक निपुण यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाविषयी साद्यंत माहिती दिली. नागपूर व गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे विनायक महामुनी, मुरुंगनाथम एम. यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अभियान गीताचे लोकार्पण करण्यात आले. कार्यशाळेत नागपूर व अमरावती विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरपंच, सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यान्वयीन यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.