प्रा. प्रशांत शिरसाट यांना पीएचडी

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड, 
prashant-shirsat : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हा क्रांतिकारी विचार मांडत पिचलेल्या समाजाला ज्ञानाचा हक्क मिळवून देणारे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्रांतीचे फलित आज समाजातील सामान्य घटकांच्या यशातून दिसून येत आहे. याचाच प्रत्यय देत कारंजा येथील प्रा. प्रशांत शामराव शिरसाट यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात ‘आचार्य’ अर्थात पीएचडी ही सर्वोच्च पदवी संपादन केली आहे. आपले हे यश त्यांनी कृतज्ञतापूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण केले आहे.
 
 
 
K
 
 
 
प्रा. शिरसाट हे स्थानिक शिक्षक कॉलनीचे रहिवासी असून, अकोला येथील श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल (एल.आर.टी.) वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील नॅक प्रक्रियेत महाविद्यालयीन ग्रंथपालाची भूमिका : नवीन नॅक चौकटीच्या विशेष संदर्भासह एक अभ्यास या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात संशोधन पूर्ण केले. २३ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाने त्यांच्या संशोधनास अधिकृत मान्यता दिली. हे संशोधन त्यांनी प्राचार्य डॉ. के. ओ. मांडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
 
 
याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. शिरसाट म्हणाले की, माझ्या आयुष्यातील ‘आचार्य’ ही सर्वोच्च पदवी प्राप्त करताना माझे मस्तक ज्या महामानवाच्या चरणी झुकते, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भीमा, तुझ्या जन्मामुळेच आम्हा सामान्यांना ज्ञानाची कवाडे खुली झाली. तुमच्या विचारांमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. डॉ. शिरसाट यांचा विविध सामाजिक संघटना व मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.