यावेळी भारताचे उत्तर निर्णायक असेल!

राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Rajnath Singh's warning to Pakistan मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत कठोर इशारा दिला आहे. केरळमधील निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या जागतिक घडामोडींचा फायदा घेत भारताविरोधात काहीही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला भारताकडून अत्यंत कठोर आणि ठोस उत्तर दिले जाईल. ते म्हणाले की, भारताचा शेजारी देश सध्या ज्या परिस्थितीत आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची धोकादायक हालचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा कोणत्याही कृतीला भारत झुकणार नाही आणि आवश्यक ती कारवाई निर्णायक पद्धतीने केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
 
 
 
warning to Pakistan
ऊर्जा सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी देशात इंधन किंवा गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचे सांगितले. भारत कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून भारतीय नौदल होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी मागील काही वर्षांत देशाने घेतलेल्या ठोस पावलांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, पूर्वी देशात वारंवार दहशतवादी हल्ले होत होते, मात्र आता परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
 
देशाच्या सुरक्षेशी तडजोड नाही
दहशतवादाविरोधात सरकारने ठाम भूमिका घेत विविध कारवाया केल्या असून देशाच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळाली आहे.या पार्श्वभूमवर त्यांनी उरी हल्ल्यानंतरची कारवाई, पुलवामा घटनेनंतरचे प्रत्युत्तर आणि अलीकडील मोहिमांचा उल्लेख करत भारत दहशतवादाविरोधात कठोर भूमिका कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला.