मुनीश्वर मलेवार
तुमसर,
Rude behavior in the name of March Ending सर्वसामान्य नागरिक आणि बँकेचे नाते अतूट आहे. ग्राहकांना बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी कायम काम पडत असते. मात्र बरेचदा बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून येणारा अनुभव ग्राहकांना निराश करून जातो. सध्या मार्च एंडिंग च्या नावाखाली बँकेतील कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी वागणूक नाराजी व्यक्त करावी अशीच आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांमधील आपसातील विसंवाद आणि त्यामुळे ग्राहकांना सहन करावा लागणारा मनस्ताप बँकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे हे सांगणारच आहे.कधीकाळी बिना सहकार, नही उद्धार असे म्हटले जायचे. हे खरं असेलही पण आता सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सहकार भारतीने या ब्रीदामध्ये आणखी एक शब्द जोडला आहे. बिना संस्कार नही सहकार, असे कायम सांगितले जाते. संस्काराची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे जाणवते. बँकेत आणि सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड दडपण असते हे मान्य आहे. पण जोपर्यंत ग्राहक आहे, तोपर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे, हेही विसरून चालणार नाही.
त्यावेळी बँकेत कामानिमित्त आलेल्या ग्राहकासोबत सौजन्याची वागणूक हा अलिखित नियम आहे. पण आज याच गोष्टीचा अभाव प्रत्येक ठिकाणी दिसतो. उद्या मार्च एंडिंग च्या नावाखाली प्रचंड काम असल्याचे भासविले जात आहे. 31 मार्च आटोपून आज 2 तारीख आली, पण बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मार्च एंडिंग चे रडगाणे संपलेले नाही. यात मार्च एंडिंग च्या नावाखाली ग्राहकांशी अभद्र आणि अपमानास्पद वागणूक सुरु असल्याचे समजते. काही बँकांमधून अशा संदर्भाच्या तक्रारी येत असून त्याची चर्चा होत आहे. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांतील विरळ होत असलेला संवाद विसंवादाला वाट मोकळी करून देत आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणे बोलणे, योग्य माहिती न देणे आणि कामात टाळाटाळ करून ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचे प्रकार होत आहेत.
बँकेत येणारे ज्येष्ठ नागरिक, शेतकरी व महिला वर्ग यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सौजणन्य या बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे नाही. तुमसर येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत गहाण असलेले साहित्य सोडविण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला आलेला अनुभव त्याने बोलून दाखवित, नाहक त्रास देण्याचा प्रकार केला जातो असे सांगितले. बँकेत येणारा ग्राहक म्हणजे गरजवंत असे समजून त्याच्याशी केली जात असलेली वागणूक नक्कीच संताप आणणारी असते. ग्राहकांसोबत सौजन्याने वागणूक ठेवल्यास बँकेच्या व्यवसायात आपोआपच परिणाम होतो. मात्र आज संस्कार विसरल्या गत अवस्था झाल्याने ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील वादविवादाच्या घटना वाढत आहेत. विशेषत्वाने राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हे अनुभव अधिक येतात. मार्च एंडिंगच्या कामामुळे नक्कीच कर्मचारी तणावात असतात. पण म्हणून नियमित ज्यांच्याशी व्यवहार आहेत अशा ग्राहकांशी असमंजसपणाने वागणे कितपत योग्य आहे. साठी बँक अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. त्यातून कौशल्यात भर पडून ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद वाढेल आणि सहकारातही संस्कार दिसून येतील.