वरोडा,
sadhanatai-baba-amte-sahajeevan-gaurav-award : आंबेजोगाई येथील साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने साधनाताई आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून यंदा 2026 पासून ‘साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. अनुराधा पाटील व कौतिकराव ठाले पाटील हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
यावर्षीचा पहिला पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील व ज्येष्ठ लेखक व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील या दांपत्याला घोषित झाला आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याला खंबीर साथ देणार्या साधनाताई आमटे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही लोमटे यांनी सांगितले.
शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र पुष्पहार व एक लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचा वितरण समारंभ, ठिकाण व तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.