तभा वृत्तसेवा
उमरखेड,
sharad-lohkare : पैनगंगा नदीपात्रावरील दिघी रेती घाटावर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कार्यक्षेत्र नसताना स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलिस अधिकाèयाने बंदूक घेऊन मजुरांच्या कपाळावर रोखल्याचा गंभीर आरोप विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेतून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी गुरुवार, 2 एप्रिल रोजी केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी पीडित कृष्णा वानखेडे व सरपंच गणेश पाळजकर, अॅड. बळीराम मुटकुळे, डॉ. अजय नरवाडे, गजेंद्र ठाकरे, नितीन शिंदे हे उपस्थित होते.
कृष्णा आष्टीकर पुढे म्हणाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद लव्हेकर हे सोमवार, 30 मार्च रोजी संध्याकाळी 5 च्या दरम्यान दिघी रेतीघाटावर रेती उत्खनन व ट्रॅक्टरने वाहतूक सुरू असताना पोहोचले आणि मजुरांच्या कपाळावर बंदूक लावून सुमारे अर्धा तास त्यांना धमकावत ठेवले. यावेळी त्यांनी माझी बायको जज आहे, असे सांगत मजुरांवर दबाव टाकल्याचा आरोपही आहे.
या घटनेची माहिती मिळताच कृष्णा आष्टीकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संबंधित पोलिस अधिकारी अरेरावी करत असून, स्वतःला पैलवान म्हणत उघडपणे आव्हान देत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, उमरखेड उपविभागीय महसूल अधिकारी सखाराम मुळे यांच्याशी बोललो असता संबंधित रेतीघाटावर कोणत्याही अधिकाèयाला पाठविण्यात आलेले नाही. तसेच, चातारी घाटाचा लिलाव झालेला नसून दिघी घाट हा नांदेड जिल्ह्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
याचप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांनीही ‘त्यांना’ पाठवले नसल्याचे स्पष्ट केल्याचे आष्टीकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
या घटनेबाबत कृष्णा वानखेडे व गणेश पाळजकर यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील घटनेत पुसदचा पोलिस अधिकारी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई कशी करतो, बंदुकीचा धाक दाखवणे कायदेशीर आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार असल्याचेही कृष्णा आष्टीकर यांनी यावेळी सांगितले.
सर्व आरोप चुकीचे
उमरखेड पोलिस ठाणे हद्दीत कायदेशीर नोंद टाकून वरिष्ठ अधिकाèयांना माहिती देऊन आमची 7 जणांची टीम सरकारी वाहनाने कारवाईसाठी दिघी रेतीघाटावर गेलो होतो. आमच्या मागे महसूल मंडळ अधिकारी प्रदीप शिवणकरसुद्धा आले होते. आम्ही सर्व रेतीघाटाच्या खालील बाजूला विरसनी घाटात उमरखेड बाजूकडे रेती उपसा चालू असलेल्या ठिकाणी गेलो. त्यावेळी तेथे असणारे सर्व ट्रॅक्टर नांदेड बाजूकडे गेले. त्यातील काही ट्रॅक्टर नांदेड तर काही ट्रॅक्टर यवतमाळ हद्दीतून रेती उपसा करत होते. आम्हाला पाहून सर्व ट्रॅक्टर नांदेड हद्दीत पळून गेले. कुठल्याही प्रकारची बंदूक कुणालाही दाखवली नाही किंवा कोणत्याही प्रकारची पैशांची मागणी कोणी केली नाही. या घटनेची उमरखेड पोलिस ठाण्यात कायदेशीररित्या स्टेशन डायरीत नोंद घेण्यात आली आहे. कृष्णा आष्टीकर यांचे सर्व आरोप चुकीचे आहेत .
शरद लोहकरे
पोलिस उपनिरीक्षण स्थागुशा