80 तासांपासून ‘श्याम’ टॉवरवरच..!

-तहसीलदार पोहचले सांत्वनासाठी -खाली उतरण्यासाठी प्रशासनाची विनवणी

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
अभय इंगळे
दिग्रस,
shyam-gaikwad-bsnl : इसापूर येथील श्याम गायकवाडच्या टॉवरवरच्या उपोषणाचा गुरुवार, 2 एप्रिल हा चौथा दिवस उजाडला. तब्बल 80 तासांपासून दिवसभर उन्हात व काल रात्रीच्या अवकाळी पावसात त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करीत त्याला खाली उतरण्यासाठी प्रशासनाने विनवणी केली.
 
 
JK
 
 
 
टॉवरवर चढून उपोषण करण्याची शक्कल लढविणाèया श्याम गायकवाडच्या मागणीचे निरसन करण्यात गटविकास अधिकारी रमेश खरोडे हारले. त्याच्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिले मात्र त्याच्या मागण्या वाढतच चालल्याचे ते सांगतात. दरम्यान सकाळी 11 वाजता तहसीलदार मयूर राऊत हे स्वतः बीएसएनएल कार्यालयाच्या टॉवरवरजवळ येऊन श्यामला समजावून गेले. मात्र श्याम गायकवाड काही केल्या खाली यायला तयार नसल्याचे दिसून येत असून या ‘टॉवरमॅन’ची समजूत आता कोणी व कशी घालावी, हा एक मोठा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
 
 
इसापूर परिसरातील त्या 6 विविध मागण्यांबाबत उपोषणाचे निवेदन देणारा श्याम गायकवाड हा चक्क उंच टॉवरवर चढून उपोषण करणार आहे याची साधी कल्पना प्रशासनाला नव्हती. तहसीलदार, ठाणेदार व गटविकास अधिकारी या विचित्र उपोषणापुढे हतबल झाल्याचे दिसून येत आहेत.
 
 
कोणाच्या तरी मध्यस्थीने श्याम गायकवाड खाली उतरावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. श्यामची ही वीरूगिरी नेमकी कोणाच्या अंगलट येईल, यावर चर्चा होत आहे. टॉवरखाली पोलिस बंदोबस्त व ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
मला आग्या माश्या चावल्या हो..!
 
 
बुधवारी रात्रीच्या पावसाने टॉवरवरच्या मधमाश्यांच्या पोळ्यावरील शेकडो आग्या मधमाश्या उडून श्याम गायकवाडला चावल्याचे सांगत टॉवरवरून पत्रकारांशी बोलताना श्यामने हंबरडा फोडला. ‘अरे, तू खाली उतर तुझा उपचार करू. तुझ्या उपोषणाबाबत बोलून तुझे समाधान करू’, असा संवाद पत्रकारांनी बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीवरून श्याम गायकवाड बरोबर साधला.