सिद्धिविनायक मंदिरात मोठा घोटाळा तक्रारीमुळे खळबळ

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Siddhivinayak Temple कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर सध्या एका मोठ्या वादामुळे चर्चेत आले आहे. मंदिराच्या काही विश्वस्तांनी कार्यकारी अधिकारी वीणा पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांच्यावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे गंभीर आरोप केले आहेत. ही तक्रार मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
 

Siddhivinayak Temple 
मंदिर ट्रस्टच्या दोन विश्वस्तांनी आणि इतर तीन स्वतंत्र तक्रारदारांनी प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आरोपांमध्ये प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेचा अभाव, अधिकारांचा गैरवापर आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता यांचा समावेश आहे. स्वतः विश्वस्तांनी ही तक्रार केल्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
कायदा व न्याय विभागाने Siddhivinayak Temple  या आरोपांची प्राथमिक दखल घेत सखोल चौकशी सुरू केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सात दिवसांत आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, जर प्राप्त स्पष्टीकरण समाधानकारक ठरले नाही, तर पुढील कठोर प्रशासकीय कारवाईची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. विभागाने मंदिरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. यात निविदा प्रक्रियेशी संबंधित मूळ कागदपत्रे, निविदा उपसमितीच्या बैठकांचे इतिवृत्त, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयांच्या नोंदी, प्रशासकीय स्तरावर जारी केलेले आदेश आणि अन्न व महाप्रसादाशी संबंधित कंत्राटे यांचा समावेश आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मंदिरात चोरीच्या प्रकरणात आठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप समोर आल्याने मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणपती बाप्पाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दानाचा विनियोग पारदर्शकपणे होत आहे का, असा प्रश्न आता सामान्य भाविकांमध्येही उपस्थित झाला आहे.