काटोलवरून वरूडमार्गे पुणे रेल्वे सुरू करा

-केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे आग्रही मागणी -आ. यावलकर व आ. ठाकुर यांची चर्चा

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
वरूड, 
start-pune-train : वरूड, मोर्शीचे आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर आणि काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही मतदारसंघातील रेल्वेसंबंधित समस्यांवर प्रकाश टाकला. दोन्ही आमदारांनी मांडलेल्या मागण्यांना वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
 
 
J
 
 
 
आ. यावलकर यांनी काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, बडनेरा, पुणे या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. या भागातील रहिवाशांना सध्या पुणे रेल्वे मार्गाशी थेट जोडणी नसल्यामुळे, प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वैष्णव यांनी आ.यावलकर यांना ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे ठाकूर यांनीही प्रस्ताव सादर केला. प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि वेग सुधारण्याच्या उद्देशाने वैष्णव यांच्याशी चर्चा केली. दक्षिण एक्सप्रेसचे पूर्वीप्रमाणेच काटोल आणि नरखेड येथील थांबे पुन्हा पुर्वरत सुरू करावेत व इतर मागण्यांमध्ये भुसावळ, नरखेड नियमित सेवेचे सातत्य राखणे आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी, सर्वेक्षणानंतर एका नवीन पुलाचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
 
 
 
नागपूर, काटोल, नरखेड रेल्वे मार्गावर ’मेट्रो’ सेवा सुरू करण्याबाबतही या चर्चेदरम्यान विचारविनिमय करण्यात आला. या याव्यतिरिक्त, वर्धा, काटोल, नरखेड मार्गासाठी नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला. दिल्ली, नागपूर मार्गावरील ढवळापूर येथील जुन्या दगडी पुलाच्या जागी आधुनिक ’बॉक्स ब्रिज’ उभारण्याची आवश्यकताही यावेळी अधोरेखित करण्यात आली. वैष्णव यांनी या सर्व प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. दोन्ही आमदार आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुलभ रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.