तभा वृत्तसेवा
वणी,
loknayak-bapuji-ane : शहरातील एका प्रमुख मार्गाला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव वणी नगर पालिकेच्या सोमवार, 30 मार्चला झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वसाधारण सभेत वेळेवर येणाèया विषयांतर्गत डॉ. आंबेडकर चौकापासून नगर पालिकेच्या मागून जाणाèया मार्गाला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा ठराव पालिकेचे उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांनी मांडला अशी माहिती नप अध्यक्ष विद्या आत्राम यांनी दिली.
शहरातील डॉ. आंबेडकर चौकापासून नगर पालिकेकडे जाणारा मार्ग यापूर्वी ‘वामनघाट मार्ग’ म्हणून ओळखला जात होता. या मार्गाला आता ‘लोकनायक बापूजी अणे मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे. बापूजी अणे हे वणीचेच सुपुत्र असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच राष्ट्रनिर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ते संविधान निर्मिती सभेचे सदस्य व बिहारचे राज्यपाल होते. शहरात त्यांच्या स्मरणार्थ उभारलेला पुतळा असून त्या परिसराला ‘अणे चौक’ म्हणून ओळखले जाते.
याच चौकातून डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणाèया मार्गाला त्यांचे नाव देऊन वणी नपाने त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा दिला आहे. या निर्णयाचे वणीकरांकडून स्वागत करण्यात येत असून शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.