रियाधमध्ये अजित डोवाल यांची महत्त्वाची बैठक

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
रियाध,
Ajit Doval's meeting in Riyadh पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या धोरणात्मक हालचाली वाढविल्या आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे जाऊन तेथील वरिष्ठ नेतृत्वाशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या भेटीत भारत-सौदी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देत प्रादेशिक घडामोडी आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर सविस्तर विचारविनिमय झाला. रियाधमध्ये आगमन झाल्यानंतर अजित डोवाल यांचे स्वागत भारताचे राजदूत सुहेल खान आणि सौदी अरेबियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर त्यांनी सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान, ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसैद अल-ऐबान यांची स्वतंत्र भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय सहकार्य, प्रादेशिक स्थैर्य आणि परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
 
 

डोवाल  
या भेटीदरम्यान पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाची परिस्थिती आणि त्याचा जागतिक परिणाम यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. भारताने या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट करत संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून उपाय शोधण्यावर भर दिला.दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील चर्चांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. याआधी झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नव्हता. त्यामुळे या भागातील परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे. या सर्व घडामोडींमध्ये भारत आपल्या मित्रदेशांशी संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवणे हे भारताच्या प्राधान्यक्रमात असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.