मुंबई,
Ashok Kharat महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, या प्रकरणावरून राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अनेकांचे नाव समोर येत असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे नाव या प्रकरणाशी जोडले गेल्याने मोठा वाद निर्माण झाला. अशोक खरातला गुरू मानत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
या प्रकरणात केवळ रुपाली चाकणकरच नव्हे, तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचंही नाव समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. महिलांच्या शोषणासंदर्भातील आरोपांमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता केवळ राजकीय क्षेत्रातूनच नव्हे, तर मनोरंजन विश्वातूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी नुकतीच या प्रकरणावर प्रतिक्रिया देत लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “अशोक खरातचं एक विधान आहे—‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’. त्याने स्वतःच मान्य केलं आहे की चमत्कार असं काही नसतं. तो विज्ञानाचा आणि काही ट्रिक्सचा वापर करून लोकांना फसवत होता.”
गणेशपुरे पुढे म्हणाले, “आता तरी लोकांनी समजून घ्यायला हवं की अशा गोष्टींमध्ये कोणताही चमत्कार नसतो. लोकांनी अंधश्रद्धेपासून दूर राहणं गरजेचं आहे.” त्यांच्या या वक्तव्याने समाजात जागरूकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले असून, अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी अशोक खरातवर टीकेचा भडिमार करत आहेत. पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भारत Ashok Kharat गणेशपुरे यांचा ‘सालबर्डी’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पूजा सावंत हिने मनोरमा प्रधान या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, चित्तरंजन गिरी, कमलाकर सातपुते, ओंकार भोजने आणि अनिल नगरकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सालबर्डी’ चित्रपटालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.