अ‍ॅट्रॉसिटी पिडीत कुटुंबांना नोकरीमुळे जगण्याची नवी उमेद

- पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे प्रतिपादन - गोंदियात पात्र वारसांना गट ‘ड’ संवर्गातील नियुक्तीपत्र वाटप

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
गोंदिया, 
indranil-naik : अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत नियम १९९५ व सुधारित नियम २०१६ मधील अनुसूचित जाती जमातीच्या खून, मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या एका पात्र वारसाला शासकीय नोकरी देण्याचा शासनाचा निर्धार असून या अंतर्गत कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीमुळे जगण्याची नवीन उमेद निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.
 
 
naik
 
 
 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी २० एप्रिल रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, समाज कल्याण समिती सभापती रजनी कुंभेरे, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (नि.श्रे.) प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कीर्तीकुमार कटरे उपस्थित होते. पालकमंत्री नाईक पुढे म्हणाले की, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत कुटुंबाला सहन करावी लागणारी हाणी भरून न निघणारी आहे. मात्र, शासनाने त्या कुटुंबाच्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम नक्कीच केले आहे आणि अशा कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट केल्याने त्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळणार आहे. यानिमित्ताने शासनात येणारे कर्मचारी हे कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासह देश सेवा ही करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले.
 
 
उपक्रमांतर्गत जिल्ह्यात गट ‘ड’ संवर्गातील शिपाई पदाचे नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. ज्यामध्ये हर्ष छेदीलाल इमलाह, संगीता भीमराज कुंभरे, देलेंद्र टोलूराम बेलबंशी, दिनेश श्रीराम दरवडे, आयरन कृष्णकुमार मेश्राम, रजनी मनोहर घमगाये, निकिता अर्पित उके, दिशा निशांत मेश्राम या ८ जणांना नियुक्ती पत्र देऊन शासन सेवेत घेण्यात आले.