बीसीसीआयचा 'ब्रह्मास्त्र'...एकाचवेळी उतरणार दोन संघ!

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BCCI's Brahmastra भारतीय क्रिकेटसमोर येणाऱ्या अत्यंत गजबजलेल्या वेळापत्रकाचा विचार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी रणनीती आखली आहे. येत्या काळात एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याने देशाकडून दोन स्वतंत्र, पण तितक्याच सक्षम संघ मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका एकाच काळात होणार असल्याने निवड समिती सुमारे तीस ते पस्तीस खेळाडूंचा विस्तृत गट तयार करत आहे. भविष्यातील स्पर्धांचा विचार करता संघाची ताकद आणि पर्याय वाढवणे आवश्यक असल्याचे मंडळाच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे.
 

BCCI 
 
 
नव्या चेहऱ्यांनाही संधी
या नियोजनाची सुरुवात येत्या आयर्लंड दौऱ्यापासून होणार असून, त्या मालिकेत अनुभवी खेळाडूंसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची चाचणी घेणे आणि पुढील मोठ्या स्पर्धांसाठी तयार पर्याय निर्माण करणे हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश आहे. पुढील काही मालिकांसाठीही अशाच पद्धतीने मजबूत राखीव फळी उभी करण्याचा विचार आहे. सध्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवडकर्त्यांची बारकाईने नजर आहे. फलंदाजीत अनेक तरुणांनी प्रभावी खेळ करून आपली छाप पाडली आहे, तर अष्टपैलू आणि गोलंदाज विभागातही काही खेळाडू सातत्याने लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे संभाव्य संघरचनेत नवोदितांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता आहे.
 
 
एका संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर
दरम्यान, नेतृत्वाच्या बाबतीतही स्पष्ट दिशा दिसून येत आहे. दोन संघांपैकी एका संघाची धुरा श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते, तर यष्टिरक्षणासाठी ध्रुव जुरेल यांच्यासारखे पर्याय पुढे येत आहेत. एकूणच, ही संपूर्ण योजना केवळ सध्याच्या ताणतणावपूर्ण वेळापत्रकाला सामोरे जाण्यासाठी नाही, तर भविष्यात कोणत्याही परिस्थितीत सज्ज राहणारी मजबूत संघरचना तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.