देशातील नेतृत्व कायम पण तणाव वाढणार!

भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
बुलढाणा,
Bhendwal Ghatamandani announced बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे शेकडो वर्षांपासून जपली जाणारी घटमांडणीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. या माध्यमातून वर्षभरातील पाऊस, शेती, देशातील राजकीय तसेच संरक्षण परिस्थितीबाबतचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करून ती रात्रभर निरीक्षणात ठेवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयावेळी तिचे निरीक्षण करून विविध निष्कर्ष काढण्यात आले.या अंदाजांनुसार देशातील सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान आपल्या पदावर कायम राहतील, मात्र त्यांच्या कार्यकाळात तणावपूर्ण परिस्थिती कायम राहील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्याचबरोबर देशाच्या संरक्षण यंत्रणांवर मोठा ताण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून संरक्षण क्षेत्रातील स्थिती तुलनेने कमकुवत राहू शकते असा अंदाज मांडण्यात आला आहे.
 
 
 
Bhendwal Ghat
 
 
आर्थिक परिस्थितीबाबतही स्थैर्य कमी
शेतीच्या दृष्टीने पाहता यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे असल्याचे घटमांडणीतून स्पष्ट झाले आहे. अनेक पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून एकूण उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. मात्र कापूस, तीळ आणि तांदूळ या पिकांचे उत्पादन चांगले राहण्याची तसेच त्यांना योग्य भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा या पिकांचे उत्पादन साधारण राहील असा अंदाज आहे. तर तीळ आणि बाजरी या पिकांची चांगली वाढ होईल असेही या भाकितात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबतही स्थैर्य कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही प्रमाणात अस्थिरता जाणवू शकते असे सूचित करण्यात आले आहे.
 
 
जून महिन्यात जोरदार पाऊस 
पावसाच्या अंदाजानुसार जून महिन्यात जोरदार पाऊस अपेक्षित आहे, जुलै महिन्यात तो सरासरी राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.या परंपरेनुसार घटामध्ये रात्रभर घडणाऱ्या नैसर्गिक बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून विविध निष्कर्ष काढले जातात. माती, धान्य, विविध वस्तू आणि त्यांच्या स्थितीवरून पाऊस, पीक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे संकेत दिले जातात. शेतकरी मोठ्या संख्येने या अंदाजांकडे आशेने पाहतात आणि त्यावर आधारित शेतीचे नियोजन करतात. जरी या घटमांडणीला वैज्ञानिक आधार नसला तरीही अनेक शेतकरी पिढ्यानपिढ्या या परंपरेवर विश्वास ठेवत आले आहेत. त्यामुळेच विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा भागातून मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहून पुढील वर्षाबाबतचे अंदाज जाणून घेतात.