मुंबई,
Tanvi Kolte महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘बिग बॉस मराठी सिझन 6’चा आज भव्य महाअंतिम सोहळ्यात समारोप झाला. गेल्या शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या या रिअॅलिटी शोने घराघरांत आपली छाप पाडली. विविध स्वभावांचे 17 स्पर्धक 100 दिवस कॅमेरांच्या नजरकैदेत राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. या प्रवासात प्रेक्षकांनी भांडणं, मैत्री, भावनिक क्षण आणि नात्यांचे बदलते रंग अनुभवले.
या सगळ्या चढ-उतारांवर मात करत आणि सातत्यपूर्ण, दमदार खेळ सादर करत तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी सिझन 6’चे विजेतेपद पटकावले. विजेतेपदाची घोषणा होताच उपस्थितांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाचा जल्लोष उसळला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तन्वीने अखेर हा किताब आपल्या नावावर करत आपली लोकप्रियता सिद्ध केली.
विजेत्या तन्वी कोलतेला 15 लाख रुपयांची रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली. यासोबतच पु. ना. गाडगीळ आणि सन्सकडून 10 लाख रुपयांचे ज्वेलरी व्हाउचर देण्यात आले, ज्याचा उपयोग रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी करता येणार आहे. तसेच तुनवाल ई मोटर्सकडून ‘लिथीनो प्रो’ ही ई-बाईकही तिला बहाल करण्यात आली. विशेष आकर्षण म्हणून रितेश देशमुख आणि ‘राज शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर फोटो भेट देण्यात आला.
विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली की, हा प्रवास तिच्यासाठी अत्यंत खास आणि शिकवणारा ठरला. या घराने तिला स्वतःला ओळखायला आणि प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवले. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला असल्याचे तिने नमूद केले. हा विजय तिने आपल्या कुटुंबाला आणि तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित केला.
तन्वीने आपल्या Tanvi Kolte संघर्षाचा उल्लेख करत सांगितले की, घरात अनेकदा तिच्या कामाबद्दल आणि ओळखीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते, ज्यामुळे तिला वाईट वाटायचे. मात्र, त्याच गोष्टींना प्रेरणा मानत तिने ठरवले होते की घरातून बाहेर पडताना तिचे नाव सर्वांच्या तोंडी असेल. अखेर तिच्या जिद्दीला यश मिळाले आणि ‘तन्वी कोलते’ हे नाव आज एक ब्रँड बनले आहे.‘बिग बॉस मराठी सिझन 6’ने पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवत मनोरंजनाचा उच्चांक गाठला. या पर्वाचा समारोप जरी झाला असला, तरी तन्वी कोलतेच्या विजयाची चर्चा महाराष्ट्रभर रंगत राहणार आहे.