ब्रम्हपुरी,
brahmapuri-furniture-mart-fire : येथील विद्यानगर परिसरात तलाठी कार्यालयानजीक बनपूरकर यांच्या इमारतीमधील नंदू पाटेकर यांच्या फर्निचर मार्टला सोमवार, 20 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.
या आगीबाबतची माहिती लगेचच पोलिस विभाग व न. प. अग्निशमन यंत्रणेला दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी जेसीपी बोलवून लांबूनच फर्निचर मार्टचे शटर तोडण्यात आले. यावेळी तप्त आगीचे लोळ व धूर मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागला. त्यावेळी पाण्याचा मारा करून अग्निशमन कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत घरमालक बनपूरकर यांच्या इमारतीला आगीमुळे अनेक तडे गेले व इमारतीचे मोठे नुकसान झाले. फर्निचर मार्टमधील फर्निचर व कच्चा माल आगीत स्वाहा झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग लागण्याचे मुख्य कारण वृत्त लिहिस्तोवर कळले नाही. संबंधित यंत्रणेने घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.