विधी शर्मा
नागपूर,
career confusion “दहावी-बारावी नंतर विद्यार्थ्यांसमोर उभा राहणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ‘आता पुढे काय?’ आणि याचे उत्तर फक्त गुणांमध्ये नसते,” असे स्पष्ट मत प्रमाणित करिअर विश्लेषक वैशाली करडे यांनी व्यक्त केले. वाढत्या करिअर पर्यायांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या संभ्रमावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.करडे सांगतात की, आजच्या काळात इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांसोबतच डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल मार्केटिंग, डिझाईन यांसारख्या नव्या क्षेत्रांनीही मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण केल्या आहेत. “पर्याय वाढले, पण स्पष्टता कमी झाली,” असे त्या नमूद करतात.
अनेक वेळा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या आवडी-क्षमता न पाहता घेतला जातो. मित्रांचा प्रभाव, समाजातील प्रतिष्ठा किंवा अपुरी माहिती यावर आधारित निवड केली जाते. त्यामुळे चुकीचा मार्ग निवडण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना, जेईई, एमएचटी-सीईटी, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांनंतर विद्यार्थ्यांवर योग्य कॉलेज, शाखा आणि शहर निवडण्याचा अतिरिक्त ताण येतो. या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास गोंधळ अधिक वाढतो.
- करिअर निवडीत समुपदेशनाची वाढती गरज
करिअर कौन्सिलिंग ही केवळ कोर्स सुचवण्याची प्रक्रिया नाही. ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, अभिरुची, क्षमता आणि कौशल्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करणारी प्रक्रिया आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची ताकद ओळखता येते. असे त्यांनी सांगितले.
करडे यांच्या मते, career confusion विश्लेषणात्मक विचार असलेले विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा संशोधनात यशस्वी होऊ शकतात, तर सर्जनशील विद्यार्थी डिझाईन, मीडिया किंवा आर्किटेक्चरमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात.यावेळी पालकांच्या भूमिकेबद्दल बोलताना “प्रत्येक मूल वेगळे असते. पालकांनी पारंपरिक चौकटीत अडकून न राहता मुलांच्या क्षमतेला समजून घेतले पाहिजे,” असे त्या सांगतात.शेवटी करिअर हा एक प्रवास आहे, अंतिम निर्णय नाही. योग्य मार्गदर्शन, लवचिकता आणि सतत शिकण्याची वृत्ती असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा यशस्वी मार्ग सापडू शकतो. असे त्यांनी नमूद केले