चिखली,
chandrashekhar-bawankule : चिखली मतदारसंघातील नागरिकांच्या वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या महसूल प्रश्नांना आता गती मिळणार आहे. राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चिखली दौऱ्यावर असताना येथील तहसील कार्यालयात थेट जनतेच्या दरबारात हजेरी लावली. स्थानिक आमदार श्वेता महाले पाटील यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित या ‘जनदर्शन’ सत्रात मंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या केवळ ऐकूनच घेतल्या नाहीत, तर त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला तातडीचे आदेशही दिले.
सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या सत्रात चिखली परिसरातील कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या आशेने आपल्या तक्रारी घेऊन आले होते. यामध्ये प्रामुख्याने सातबारा उताऱ्यांमधील त्रुटी, जमिनीच्या वारस नोंदी, फेरफार नोंदणीत होणारा विलंब आणि भूमी अभिलेख विभागाशी संबंधित प्रलंबित वादांचा समावेश होता. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीच्या वाटणीवरून रखडलेल्या प्रकरणांची निवेदने मंत्र्यांकडे सुपूर्द केली. बावनकुळे यांनी प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेत नागरिकांशी थेट संवाद साधला.
यावेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी आक्रमकपणे मतदारसंघातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. नागरिकांना साध्या कामांसाठीही शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, ही बाब त्यांनी महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. "जनतेचे प्रश्न थेट सरकारपर्यंत पोहोचवून ते निकाली काढणे हेच आमचे कर्तव्य आहे," असे सांगत त्यांनी या प्रकरणांचा स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
निवेदने स्वीकारल्यानंतर महसूलमंत्र्यांनी वेळ न घालवता तहसील कार्यालयातील सर्व प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी प्रलंबित फाईल्सचा आढावा घेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कोणतीही केस विनाकारण प्रलंबित ठेवू नका आणि सामान्य माणसाला हेलपाटे मारायला लावू नका, असे सक्त निर्देश त्यांनी दिले. कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून देत, दिलेल्या वेळेत तक्रारींचे निवारण न झाल्यास कडक कारवाईचा इशाराही मंत्र्यांनी दिला आहे. या सत्रा मुळे चिखलीतील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रशासकीय यंत्रणा आता कामाला लागली आहे.