चंद्रपूर,
cheated-by-promising-jobs : रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्या एका सराईत टोळीचा चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन मुख्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत या टोळीने 26 तरुणांची तब्बल 2 कोटी 17 लाख 35 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मुजीबुर लतीफ कुरेशी (50, रा. चंद्रपूर), रवींद्र संभाजी वाघमारे (45, रा. चंद्रपूर) आणि सुरेंद्र रामकृष्ण तेलंग (50, रा. नागपूर) यांनी फिर्यादी कौस्तुभ विलास आदेश आणि इतर 14 लोकांना रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपींनी या सर्वांकडून 1 कोटी 31 लाख 60 हजार रुपये उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना कोलकत्ता येथे नेऊन हॉटेलमध्ये थांबवले व विविध ट्रेनिंग स्कूलमध्ये नेऊन बनावट प्रमाणपत्रे दिली. इतकेच नव्हे तर, बनावट पोलिस ‘व्हेरिफिकेशन रिपोर्ट’ आणि बनावट नियुक्ती पत्रे देऊन त्यांची मोठी फसवणूक केली.
रामनगर पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने वेगाने तपास चक्रे फिरवली. यातील आरोपी सुरेंद्र रामकृष्ण तेलंग याला 3 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
नागपूर, भंडारा, गडचिरोली व जळगावपर्यंत जाळे
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या टोळीने केवळ चंद्रपूरच नव्हे, तर नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि जळगाव जिल्ह्यातील एकूण 26 मुलांकडून नोकरीच्या नावावर 2 कोटींहून अधिक रक्कम उकळली आहे. ज्या तरुणांची या तीन आरोपींनी रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. ज्यांना बनावट नियुक्ती पत्रे दिली आहेत, अशा सर्व पीडितांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.