राज्यावर दुहेरी संकट...उष्णतेची लाट आणि अवकाळी इशारा!

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
पुणे, 
Double crisis on the state राज्यात हवामान पुन्हा एकदा अस्थिर झाले असून उष्णतेच्या तीव्र लाटेसोबतच अवकाळी पावसानेही अनेक भागांत हजेरी लावल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देत दक्षतेचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण विभागात रायगड जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात वातावरणात सतत बदल जाणवत असून नागरिकांनी सावध राहावे असे सांगण्यात आले आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या घाट परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
 

Double crisis on the state 
 
विदर्भातही पावसाचा इशारा
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून जळगाव भागात अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. त्याचबरोबर काही भागांत तापमान वाढून उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.विदर्भात चंद्रपूर, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र भंडारा, बुलढाणा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात एकीकडे पावसाचे सावट तर दुसरीकडे उष्णतेची लाट अशा मिश्र हवामानामुळे नागरिकांची गैरसोय वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.