कचरा नको, स्वच्छता हवी

सेमिनरी हिल्समध्ये पर्यावरण जागर

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Earth Day Nagpur 2026  जागतिक पृथ्वी दिनानिमित्त सेमिनरी हिल्स परिसरात आयोजित ‘रन, वॉक, क्लीन – फॉरेस्ट प्लॉगिंग ड्राईव्ह’ या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. वाईल्ड अजाईल फाऊंडेशनच्या पुढाकाराने आणि नागपूर प्लॉगर्स, डीजीएस कॅप्स तसेच नागपूर महानगरपालिकेच्या पीआययू टीमच्या सहकार्याने हा उपक्रम रविवारी सकाळी उत्साहात पार पडला.
 

Earth Day Nagpur 2026 
जागतिक पृथ्वी दिनानिमित्त वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचा पुढाकार
सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत आयोजित या उपक्रमात सुमारे २५० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सहभागींसाठी विविध प्रवेशद्वारांवर स्टॉल्स उभारून कचरा पिशव्या, हातमोजे, मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. गटांमध्ये विभागलेल्या स्वयंसेवकांनी सेमिनरी हिल्सच्या जंगल परिसरात स्वच्छता मोहीम राबवत सुमारे ४७० किलो कचरा गोळा केला. यात १९० किलो प्लास्टिक तर २८० किलो इतर कचऱ्याचा समावेश होता.
सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरण, माती, पाणी आणि वन्यजीवांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. “हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असे वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचे संस्थापक प्रफुल देशमुख यांनी सांगितले.दरम्यान, डीजीएस कॅप्स संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते अधिक दृढ झाले, अशी प्रतिक्रिया पवन सारडा यांनी व्यक्त केली.या सामूहिक प्रयत्नातून ‘स्वच्छता हीच जबाबदारी’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.