टरबूज उत्पादकांची आर्थिक कोंडी

- दर कोसळले, निर्यात ठप्प

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
गोंदिया, 
watermelon-growers : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम आता ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून, जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा टरबूजाचे उत्पादन चांगले झाले असले तरी दर कोसळल्याने आणि निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.
 
 
watermelon
 
 
 
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर टरबूज लागवड करण्यात आली होती. अंदाजे २०० हेक्टर क्षेत्रावर घेतलेल्या या पिकाला अनुकूल हवामानामुळे उत्तम उत्पादन मिळाले. मात्र, बाजारपेठेत मागणी घटल्याने आणि निर्यात बंद झाल्याने शेतकर्‍यांना त्यांनी पिकविलेल्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही.पूर्वी टरबूजाला प्रति किलो १२ ते १८ रुपये दर मिळत होता. सध्या हा दर घसरून केवळ ५ ते ८ रुपयांवर आला आहे. उत्पादन खर्च सुमारे १० रुपये प्रति किलोपर्यंत जात असल्याने शेतकर्‍यांना थेट तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी तयार माल शेतातच पडून सडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निर्यात ठप्प झाल्याने व्यापार्‍यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
 
 
यामुळे स्थानिक बाजारातही टरबूजाची मागणी कमी झाली आहे. वाहतूक खर्च, मजुरी आणि देखभालीचा वाढता खर्च यामुळे शेतकर्‍यांची अडचण आणखी वाढली आहे. काही शेतकर्‍यांनी १५ ते १८ एकरांपर्यंत टरबूज लागवड केली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही टरबूज पिक घेत आहोत. यंदा उत्पादन चांगले आले, पण निर्यात बंद झाल्याने आणि दर कोसळल्याने तयार माल शेतातच खराब होत असल्याची व्यथा एका शेतकर्‍याने व्यक्त केली. दुसर्‍या शेतकर्‍याने कमी दरात विक्री करण्यास तयार असूनही व्यापारी माल घ्यायला पुढे येत नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना या कोंडीतून बाहेर काढावे अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे.