‘एमपीसीबी’च्या प्रादेशिक अधिकार्‍यावर ‘एफआयआर’!

* आ. सुधीर मुनगंटीवार यांची पोलिस ठाण्यात धडक * यादव यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवण्याची केली मागणी

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर, 
sudhir-mungantiwar : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूर येथील प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यासाठी सोमवारी दुपारी, राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेकडो शेतकर्‍यांसह ते त्याठिकाणी पोहोचले.
 

k 
 
 
 
ही तक्रार, केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाची नसून, कायद्याने सोपवलेल्या कर्तव्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर थेट परिणाम करणारी कृती केल्याबाबत आहे. ‘एमपीसीबी’च्या प्रादेशिक अधिकार्‍याने वेळीच प्रदुषण रोखण्यासाठी पाऊले उचलली नाही. त्यांच्या यागैरकृत्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून, पर्यावरणीय संतुलनही बिघडले आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
 
 
चंद्रपूर तालुक्यातील मौजा-बेलसनी येथील महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी सन 2024 पासून कोल वॉशरीज सुरू करून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय प्रदूषण पसरवले आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. शासन नियुक्त समितीने पंचनामा करून रु. 68,61,864/- इतकी नुकसान भरपाई निश्चित केली असून, ती अद्याप वसूल करण्यात आली नाही. ही नुकसान भरपाई वसूल करण्याची जबाबदारी प्रादेशिक अधिकारी यांची होती. पण त्यांनी आपले शासकीय कर्तव्य पार पाडले नाही व वसुलीची कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मुनगंटीवार यांच्यासह शेतकर्‍यांनी लावला. दोषीवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
 
 
तानाजी यादव यांच्याशी तभाने संपर्क साधला असता ते म्हणाले, मी सध्या एका सुनावणीत आहे. आता काहीच सांगू शकत नाही.
 
यादव यांनी दोषी उद्योगास संरक्षण दिलेः आ. मुनगंटीवार
 
 
‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्या निष्क्रियतेमुळे थेट सार्वजनिक व पर्यावरणीय नुकसान झाले असून, त्यांनी दोषी उद्योगास अप्रत्यक्ष संरक्षण दिले आहे, असाही आरोप आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लावला.