राज्यात उष्णतेनंतर पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
पुणे
Maharashtra weather update राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा अनुभव घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 

Maharashtra weather update 
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात उष्णतेने कहर केला असून काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. बहुतांश भागांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले. या तीव्र उष्णतेदरम्यानच हवामान विभागाने आता अचानक पावसाचा इशारा दिल्याने राज्यात “दुहेरी संकट” निर्माण झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला होता.कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा धोका कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे आधीच पावसामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील Maharashtra weather update इंदापूर तालुक्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कांदलगाव, सरडेवाडी, शहा हिंगणगाव आणि उजनी पट्टा परिसरात रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. अक्कलकोट तालुक्यात बोरेगाव, हन्नूर आणि दर्शनाळ परिसरात गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढून ठेवलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गावर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. हवामान विभागाच्या पुढील अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.