ग्रामरोजगार सेवकाच्या संपामुळे मनरेगाचे काम ठप्प

*२० दिवसापासून संप सुरूच

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
सेलू,
mgnrega-work-halted : सेलू पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या ग्राम रोजगार सेवकांचा २० दिवसांपासून संप सुरू आहे. याकडे अद्यापही शासनाचे लक्ष गेले नसल्याने याचा फटका थेट ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना बसला आहे. लाभार्थी पंचायत समितीच्या पायर्‍या झिजवत आहे. प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांनी १ एप्रिल पासून काम बंद आंदोलन सुरू केले. याचा प्रशासनाच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः मनरेगाची बहुतांश कामे ठप्प झाली असून याचा थेट फटका मजुरांना बसत आहे.
 
 
JK
 
 
 
तालुयातील सुमारे ६२ ग्राम रोजगार सेवक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मजुरांची नोंदणी, हजेरी नोंदविणे, कामांचे नियोजन आणि मजुरी वितरणाची संपूर्ण साखळी खंडित झाली आहे. परिणामी, ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला असून पंचायत समिती अंतर्गत विविध विकासकामे रखडली आहे.
 
 
ग्राम रोजगार सेवक संयुत कृती समितीच्या निवेदनानुसार, शासनाने ३ ऑटोबर २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दरमहा ८ हजार रुपये मानधन आणि २ हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तब्बल १८ महिने उलटूनही प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने रोजगार सेवकांमध्ये नाराजी वाढली आहे. याशिवाय फेस ऑथेंटीकेशन सारख्या लिष्टामुळे कामकाजात तांत्रिक अडचणी येत असल्याचा आरोपही रोजगार सेवकांनी केला आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढून कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
३ आटोबर २०२४ च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी, मानधन व प्रवास भत्ता थकबाकीसह अदा करणे, फेस ऑथेंटीकेशन अ‍ॅप मधील तांत्रिक अडचणी दूर करणे आदी मागणी ग्रामरोजगार सेवकांच्या आहेत. तालुयातील ६२ ग्रामरोजगार सेवक संपात सहभागी झाल्याने ग्रामीण प्रशासनाची गती मंदावली आहे. शासनाने तात्काळ निर्णयाची अंमलबजावणी करून मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुका रोजगार सेवक संघटनेने दिलेला आहे.
 
 
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तालुका रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष शुद्धधन नागदेवते, प्रीतम ऊईके, अतुल राऊत, श्रद्धा यादव, विशाल म्हैसकर, मनोहर तेलतुंबडे, शाम चव्हाण, अर्चना भगत, आदी ग्रामरोजगार सेवकांनी केला आहे. यासंदर्भातील निवेदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी देवानंद पाणबुडे यांना यापूर्वीच देण्यात आले आहे.