मुंब्रा हादरले! सांडळ मिरवणुकीत डीजे कोसळून ७-८ जण गंभीर जखमी

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
मुंब्रा
Mumbra rocked मुंब्रा परिसरात सांडळ मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अमृत नगर भागात ख्वाजा फक्रुद्दीन शाह बाबा यांच्या उर्सानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजेचा अपघात होऊन सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात संगीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यक्रम सुरू असताना डीजे वाहनावर अनेक जण उभे होते. या वेळी डीजेवर क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने त्याचा तोल अचानक बिघडला आणि तो जमिनीवर कोसळला. या घटनेमुळे डीजेवर तसेच जवळपास नाचत असलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि अनेक जण खाली पडले.
 
Mumbra
 
या अपघातात काही जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू केला आहे. Mumbra rocked ख्वाजा फक्रुद्दीन शाह बाबा यांच्या उर्सानिमित्त दरवर्षी ही पारंपरिक सांडळ मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते आणि त्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. मात्र यावेळी घडलेल्या अपघातामुळे या उत्सवावर शोककळा पसरली आहे. घटनेचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर समोर आले असून त्यात डीजे अचानक कलंडून जमिनीवर कोसळताना दिसत आहे. त्या वेळी वाहनावर आणि आसपास उभ्या असलेल्या लोकांचा तोल जाऊन गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येते. सुदैवाने डीजे फार वेगाने किंवा जोरात न पडल्याने काही लोक मोठ्या धोक्यापासून वाचले, तरीही काही जण गंभीर जखमी झाले आहेत.