मुंबई,
Nandita Patkar gets married again मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या चाळिशीनंतर तिने आयुष्यात नवा अध्याय सुरू करत प्रथम मुंबईत कायदेशीर पद्धतीने विवाह केला आणि त्यानंतर उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात पारंपरिक धार्मिक पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला. नंदिता पाटकरने नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्यासोबत विवाहबद्ध होत आपला नवीन संसार सुरू केला आहे. या विवाहसोहळ्याचे काही खास फोटो तिने समाजमाध्यमांवर शेअर केले असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात पार पडलेला हा विवाह सोहळा अत्यंत पारंपरिक आणि धार्मिक विधींनुसार झाला. या प्रसंगी नंदिता पाटकरने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती, हातात हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा असा पारंपरिक लूक तिने साकारला होता.
अभिनय क्षेत्रात नंदिता पाटकरने ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातून तसेच ‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय तिने ‘खारी बिस्किट’ आणि ‘लालबागची राणी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विवाहानंतर तिने भावना व्यक्त करत सांगितले की काही क्षण आपल्या नियोजनाप्रमाणे घडतात, तर काही क्षण नियतीने ठरवलेले असतात. विश्वास निर्माण करणे आणि स्वतःचे मन उघडणे सोपे नसते, मात्र हळूहळू ते घडत गेले आणि दोघांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पवित्र स्थळी पार पडलेला हा विवाह तिच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरल्याचेही तिने सांगितले.