अमरावती,
parthwada-sexual-abuse-case : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या ५ पैकी ३ मोबाईलमधला डाटा रिकव्हर करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. योग्यावेळी त्याची माहिती दिली जाईल, असे सांगून पोलिसांनी सस्पेन्स वाढविला आहे. अन्य जप्त उपकरणांची पण तपासणी सुरू आहे. सदर प्रकरणात आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शनिवारी नागपुरच्या १५ वर्षी पीडितेचे बयान पोलिसांच्या विशेष पथकाने नोंदविले. ते बयान या प्रकरणात सर्व प्रथम दाखल गुन्ह्याशी जोडण्यात आले आहे. अयान अहमद व अन्य ७ आरोपींचा त्यात समावेश आहे. पोलिसांसाठी ही जमेची बाजू असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी बयान उपयुक्त ठरणार आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी उजेर खान इकबाल खान (२० वर्ष, रा. परतवाडा) याच्यावर १६ वर्षी मुलीला वारंवार फोन करून त्रास दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने ही तक्रार दिली आहे. सदर प्रकार लक्षात आल्यावर उजेर खान याला पीडितेच्या पालकांनी समजविले होते. त्याउपरही त्याच्याकडून त्रास देणे सुरूच होते. विशेष तपास पथकच या गुन्ह्याचा तपास करीत आहे.
लैंगिक शोषण प्रकरणातल्या एकूण ८ आरोपींकडून ५ मोबाईल जप्त करण्यात आले होते. ते सर्व मोबाईल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन मोबाईलचा डाटा मिळाला आहे. त्याचे विश्लेषण सुरू आहे. योग्यवेळी त्या संदर्भातली माहिती देण्यात येईल. तसेच इतर ६ मोबाईल, लॅपटॉप, टॅब, हार्ड डिस्क तातडीने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे. त्यातून प्राप्त होणार्या माहितीची आम्हाला प्रतीक्षा आहे. पोलिस सर्वच शक्यतांचा विचार करून तपास करीत आहे. इतरही पीडितांनी कोणत्याही दडपणाला किंवा भीतीला बळी न पडता धैर्याने समोर येऊन आपले बयान नोंदवावे. बयान देण्यासाठी पुढे येणार्या प्रत्येक पीडितेची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्याची कायदेशीर खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने किंवा पीडितेने तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले. पत्रकार परिषदेला पोलिस निरीक्षक किरण वानखडे उपस्थित होते.
प्रकरणाची व्याप्ती वाढणार
मोबाईल व अन्य उपकराणातून जो डाटा रिकव्हर होत आहे, त्यातून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच पोलिस प्राप्त डाटाचे विश्लेषण अतिशय शांत डोक्याने करीत आहे. तपासातले प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्यात येत आहे. मोबाईमधून काय जप्त झाले, याची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.