वर्धा,
summer-training : इयत्ता दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम चालू सत्रापासून बदलणार असून नवीन अभ्यासक्रमासंबंधीचे प्राथमिक शिक्षकांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण मे महिन्यात आयोजित आहे. तसेच मे ते जून पर्यंत जनगणनेचे कामही चालणार असून त्यांच्याकडे प्रगणक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी मे महिन्यातच शिक्षकांचे प्रशिक्षण असून उन्हाळ्यात मतदार पडताळणीचे कामही सुरूच राहणार असून उन्हाळ्याच्या सुट्टीत असलेले जनगणनेचे काम आणि मतदार यादी पडताळणीचे काम लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण स्थगित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

चालू शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रमासंबंधीचे प्राथमिक शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण ११ ते १४ मे आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण १८ ते ३० मे या कालावधीत आयोजित करण्याचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सह संचालकांनी ९ रोजी निर्गत केले आहे. भारताच्या दशवार्षिक जनगणनेचे काम १६ मे ते २४ जूनपर्यंत चालणार असून त्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच प्राथमिक शिक्षकांच्या सेवा शासनाने अधिग्रहित केल्या आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण सुद्धा मे महिन्याच्या पहिल्या व दुसर्या आठवड्यात आयोजित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात मतदार यादी पडताळणी (एसआयआर)चे सर्वेक्षण बीएलओ म्हणून नियुत केलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा मतदार पडताळणीचे काम सुरूच राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांची मोठी तारांबळ उडणार असून नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडे केली आहे. उन्हाळी सुटीतील शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द करण्यासाठी शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला सूचना देण्याची विनंती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षक आयुत यांच्याकडे केली आहे.