दिवसभरात 50 खेप लाईन बंद
अभियंता बालपांडे ‘नॉट रिचेबल’
अभय इंगळे
दिग्रस,
Power supply दैनंदिन जीवनात अत्यंत मोल असलेल्या विद्युत व्यवस्थेचे ग्राहकांच्या हाती अव्वाच्या सव्वा विद्युत बिल थोपवून ही रक्कम सक्तीने वसूल करणारे दिग्रस विद्युत कार्यालय उन्हाळ्याच्या या दिवसात चार चार तास लाईन बंद करून, अभियंते ‘नॉट रिचेबल’ या मनमानीने आता लोक चांगलेच वैतागून गेले आहेत. यांची तक्रार आता कुठे व कशी करायची असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मागील काही महिन्यांपासून शहराची विद्युत व्यवस्था बिघडली आहे. काही वेळाच्या फरकामध्येच वीज येणे-जाणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. एका तासात अनेक वेळा नव्हे तर काही मिनिटाच्या फरकामध्ये वीज येणे-जाणे होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गेल्या आठवडयापासून तर चार-चार तास वीज लाईन बंद राहत असल्याने यावर आधारित व्यवसायांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. विशेषकरून पीठ गिरणी, कृषी पंप, पाणीपुरवठा व्यवस्था, रुग्णालय आणि इतर व्यवसाय यामुळे बाधित होत आहेत. कोणतेही नियोजन न करता सकाळपासून दिवसभर तास-तास विद्युत पुरवठा खंडित होत आहे. अंगाची लाहीलाही करणाèया तळपत्या उन्हात पंख्याविना जगणे कठीण झाले आहे. वीजपुरवठा खंडित रहात असल्याने इर्न्व्हर्टर नसलेल्या घरांना पंख्याविना उकाडा सहन करणे कठीण होत आहे. विजेच्या या लपंडावाकडे सत्ताधारी तर दूरच, पण विरोधकांचेही दुर्लक्ष असल्याने आता आमचा वाली कोण हाही प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
Power supply वीज नेमकी किती वेळ राहील आणि केव्हा बंद होईल याची काही शाश्वती नसल्याने चालते काम अर्धवटच राहण्याचा प्रकार होतो आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहराची पाणीपुरवठा व्यवस्था बिघडली आहे. याबाबत वीजवितरणच्या अधिकाèयांकडून अनेक कारणे सांगितली जात आहेत. अशा वेळी विद्युत वापर कमी झाला असला तरी मात्र विद्युत बिलात काही कपात झाली असेल असेही नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरत आहे. सध्या कडक तापमानात काही कारण नसताना, किंवा पूर्वसूचना न देता लाईन बंद करणे, हा प्रकार काय यावर वीजवितरण कार्यालयात किंवा अभियंता यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर संपर्क होत नसल्याने या परिस्थितीत लोकांना किती त्रास सोसावा लागत आहे हे आता कोणाला सांगणार, असा विषय असल्याने वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष देऊन विद्युत वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.