जिल्ह्यातील शाळा सकाळी १० वाजेपर्यंतच

वाढत्या तापमानामुळे निर्णय

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
rising-temperatures : विदर्भात वाढत असलेल्या तापमानाची तीव्रता आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत कपात करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आता दहा वाजेपर्यंत भरणार आहेत.
 

k 
 
 
 
नव्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी आता केवळ सकाळी ७ ते १० या वेळेतच भरतील. हा आदेश २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत लागू राहील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सकाळी १० नंतरच्या उर्वरित तासिका ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हा आदेश सर्व अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांसाठी बंधनकारक असेल.
 
 
वाढत्या उष्म्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय योजण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी १० नंतर शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पुरेसे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.