राऊतांचा 'गौप्यस्फोट' राजकारणात खळबळ

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
मुंबई
Sanjay Raut महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. संवैधानिक पदांवर असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, असे म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
sanjay raut

 
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, २०२३ मध्येच संसदेत ‘नारी शक्ती अधिनियम’ मंजूर झाला होता आणि १६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने त्याची अधिसूचना काढून कायदा लागूही केला होता. असे असताना पुन्हा एकदा महिला आरक्षणाच्या नावाखाली राजकीय गोंधळ निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “जर कायदा आधीच लागू झाला असेल, तर आता पुन्हा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढण्याचा हेतू काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 
राऊत यांनी उपमुख्यमंत्री  Sanjay Raut  देवेंद्र फडणवीस यांच्या २० सप्टेंबर २०२३ च्या जुन्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख करत सरकारच्या भूमिकेतील विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या पोस्टमध्ये फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाला ऐतिहासिक ठरवत त्याचे स्वागत केले होते. त्यामुळे आता त्याच मुद्द्यावरून “भ्रूणहत्या” किंवा विरोधकांवर आरोप करणे हा विरोधाभास असल्याचा दावा त्यांनी केला.
 
 
 
सरकारकडून सुरू असलेले वक्तव्ये ही जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप करत राऊत यांनी या प्रकरणावरून राजकीय दुटप्पीपणा उघड होत असल्याचे म्हटले. “२०२३ मध्ये कायदा मंजूर होऊन राष्ट्रपतींचीही स्वाक्षरी झाली असेल, तर पुन्हा नव्याने आरक्षणाच्या घोषणांचे राजकारण का केले जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आधीच्या विधानांबाबत जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.