वरूड तालुक्यात वादळाचे थैमान

-छपरे उडाली, वृक्षांची पडझड -विजेचे खांब कोसळले

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
वरूड, 
storm-hits-warud : पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वरूड तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाट तसेच वेगवान वादळी वार्‍यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी अनेक महाकाय वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली, काही ठिकाणच्या विद्युत वाहिन्या तुटून पडल्याने काही तास सर्वत्र काळोख पसरल्याने गर्मीमुळे व डासांमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
 
 
 
njkn
 
 
कित्येक घरांवरील टिनांचे पत्रे उडाल्याने परिवार उघड्यावर आले. या वादळी वार्‍याने शेतकर्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मोकाट जनावरांची पळापळ झाली. उन्मळून पडलेल्या वृक्षांची सकाळी प्रशासनाने युद्ध पातळीवर कटाई करून रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. संभाव्य हवामान बदल लक्षात घेता तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत, काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री, झाकणाने सुरक्षित ठेवावीत, वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.