उन्हाळ्यात पाणी पेटतेपावसाळ्यात मात्र विझते!

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
वेध
अनिल उमाकांत फेकरीकर
Water is precious जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत करतं पाणी, काठावर शेवटचं आचमन असतं पाणी. एवढा मौल्यवान प्रश्न असूनही तो नेहमीच उन्हाळ्यात पेटतो, पण पावसाळा येताच विझतो. या पद्धतीने पाणी प्रश्न कधीच सुटणार नाही. उलट त्यात गुंता वाढेल अन् भविष्यात शेकडो लोकांना तडफडून कदाचित मारेलही. सरकारने जलस्तर वाढावा म्हणून प्रत्येक नवीन इमारतीवर पाण्याचे पुनर्भरण करण्याची सक्ती केली आहे. ती सर्वच इमारतींसह घरांवर करायला हवी. पाण्याचा जमिनीतून वाढत असलेला उपसा गंभीर विषय आहे. बँकेतील खात्यात जेवढी रक्कम असते त्यातील काही पैसे तसेच ठेवून उर्वरित काढावे लागतात. अन्यथा बँक दंड आकारते. निसर्गाचीही वॉटर बँक आहे. तिचेही काही नियम आहेत. जर आपण बँकेतील नियम पाळतो, तर निसर्गाने ठरविलेला दंडक का टाळतो, उत्तर पाण्याची नासाडी करणार्‍यांना तडफडत का असेना द्यावे लागेल. कारण निसर्गाचे कोर्ट खूप कठोर आहे. ते माणूस ऐकत नसल्यास कुठल्याही क्षणी त्सुनामी आणू शकते. त्यातून वाचण्यासाठी वशिलेबाजी चालत नाही. तिथे तारीख मिळत नाही, उलट थेट शिक्षा हेच ठरलेले असते.
 
 
watereedszl
 
अशा कठोर कोर्टाच्या देखरेखीखाली आपण वावरत असतानाही पाण्याची नासाडी करतो, बाब समजून टाळायला हवी. ‘उदक तारक उदक मारक | उदक नानासौख्यदायक | उदकाचा विवेक अलौकिक आहे ॥’ असे समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात म्हटले आहे. त्यानुसार आपण काहीही करायला तयार नाही. नागपूर शहरात २०१८-२०१९ मध्ये पाणीबाणी निर्माण झाली होती. पहिल्यांदा पेंच प्रकल्प येथील कुंवारा भिवसेन जलाशयातील डेड स्टॉकचे पाणी जनतेसाठी सोडण्यात आले होते. अशीच अवस्था महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर, अमरावती, जळगाव, मनमाड, अकोला, वाशीम, चंद्रपूर यासह प्रत्येक शहरांतील आहे. वाढते शहरीकरण, पाण्याची नासाडी यामुळे पुढील काळात पाणी हाच मुद्दा लोकांसाठी रक्तदाब वाढविणारा ठरेल. यावर उपाय म्हणून आता घराघरात काम करणार्‍या महिला कामगारांना पाण्याचे महत्त्व द्यायला हवे. कमीत कमी पाण्यात धुणी-भांडी कशी पूर्ण करायची याचे तंत्र त्यांना समजावून सांगायला हवे. नळ सुरू ठेवायचा आणि तासन्तास धुणी भांडी करायची हे प्रकार टाळायला हवेत. आज घरोघरी पाण्याची नासाडी सुरू आहे. विशेष म्हणजे एखाद्याने यावर विचार मांडले तर त्याला शत्रू मानले जाते किंवा राजकारण आणून पाणी वाचविण्यासाठी व्यक्तीला गोत्यात आणले जाते. परिणामी तो स्वत:च कसे या संकटातून वाचायचे याचेच तंत्र समजून पाणी बचतीचा मंत्र बासनात गुंडाळून ठेवतो. आपल्या देशात नाल्यांद्वारे वाहत जाणार्‍या सांडपाण्याचा पुर्नवापर वाढायला हवा. पूर्वी उन्हाळा येताच गावागावात टँकरद्वारे पाणी द्यावे लागायचे. त्यात आता घट झाली आहे. याकरिता जलस्वराज्य आणि मागेल त्याला शेततळे या फलदायी ठरल्या आहेत. जेवढे पाणी जमिनीत जिरेल तेवढाच जलस्तर उंचावेल अन् उन्हाळ्यातही ते आपल्याला मुबलक प्रमाणात मिळेल. आजचा दिवस चांगला आहे. उद्याचाही दिवस चांगला करायचा असेल तर उन्हाळ्यात पेटणारा पाण्याचा प्रश्न पावसाळ्यात विझू न देता तेव्हाच पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत कसा जिरेल यावर भर द्यायला हवा. याचा शुभारंभ प्रत्येकाने करायला हवा.
 
 
Water is precious  पाणी कधीच शिळे होत नसते. मात्र दररोज सकाळी घराघरांत एक दिवसांपूर्वी भरलेले पाणी दुसर्‍या दिवशी संडासात ओतले जाते. जे पाणी शिळे होत नाही, ते फेकण्याची गरज काय? भरपूर शिकलेल्या महिला आणि पुरुष ही कृती करतात. त्यांना पाहून मनात राग निर्माण होतो अन् डोळ्यात अश्रू येतात. पण हाती अधिकार नसल्याने गप्प बसावे लागते. विशेष म्हणजे शासनातर्फे पाणी बचत व्हावी याकरिता योजना तयार केल्या जातात. त्यांचा भरणा ग्रामीण भागावर अधिक असतो. मग शहरातील लोकांनी पाण्याची नासाडी करायची की काय, असाही त्यातून अर्थ काढावा का? पाणी बचतीची योजना आणायची असल्यास ती सरसकट सर्वांना लागू करायला हवी. ग्रामीण भागातील लोक उपयोग परसबागेत करून सकस आहार मिळवितात. शहरातील लोक नाल्याद्वारे ते पाणी सोडून आम्ही पुढारलेले असल्याचा आव आणतात. मग त्यांनी सदुपयोग करायचा आणि यांनी दुरुपयोग असा प्रकार आपणही किती दिवस खपवून घ्यायला हवा. शेवटी, आस धरा, कास धरा, पाणी बचतीचा आजपासून ध्यास धरा...! अन्यथा रणरणत्या उन्हात पाणी मिळविण्यासाठी तयार राहा.
 
९८८१७१७८५९