जिल्ह्यातील धरणात कुठे ५३ तर कुठे २५ टक्केच जलसाठा

*उष्णतामानाचा परिणाम

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
water-storage : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान देशात सर्वाधिक होते. ४५ अंशावर गेलेल्या तापमानाने नागरिकांना मोठ्या उकाड्याचा सामना करावा लागला. आता जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली असून कुठे ५३ तर कुठे २५ टकेच जलसाठा शिल्लक आहे.
 

KL 
 
 
 
आज सोमवार २० रोजी जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, मागील आठवड्यात जिल्ह्याच्या तापमानात झपाट्याने वाढ होऊन कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. उष्णतामानामुळे जलाशयांतील पाण्याची मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. प्रत्येक दिवशी जलाशयांतील पाणी पातळीची नोंद घेऊन आकडेवारी अपडेट करणे क्रमप्राप्त असतानाही वर्धा पाटबंधारे विभागातील अधिकारी आठवड्यातून एकदाच जलाशयांतील पाणी पातळीची माहिती घेत ती अपडेट करीत असल्याने या संपूर्ण प्रकाराकडे वर्धा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते.
 
 
जिल्ह्यात ११ मोठे व मध्य जलाशय आहेत. याच जलाशयातून नागरिकांना पिण्याचे पाणी, शेतकर्‍यांना शेतीसाठी तसेच काही लहानमोठ्या उद्योग व संस्थांनाही पाण्याचा पुरवठा केला जातो. आठवडाभरापासून जिल्ह्याचे तापमान देशात सर्वात जास्त नोंदविण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या १५ एप्रिलच्या अहवालानुसार, बोर प्रकल्पात ५३.०९ टके, निम्न वर्धा प्रकल्पात ५२.५५, धाम प्रकल्पात ५०.२३, पोथरा प्रकल्पात २३.६४, पंचधारा प्रकल्प ३२.६९, डोंगरगाव प्रकल्प ३८.९२, मदन प्रकल्प ४५.७४, मदन उन्नई प्रकल्प ००.००, लाल नाला प्रकल्प ५१.९६, वर्धा कार नदी प्रकल्प ३६.४६ तर सुकळी लघु प्रकल्पात अवघे २५.२२ टकेच जलसाठा असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
 
 
जिल्ह्यात ११ मोठे व मध्यम जलाशय आहेत. या जलाशयांची जबाबदारी वर्धा पाटबंधारे विभागाकडे आहे. हे जलाशय सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी उपयुत ठरतात. याच जलाशयांतून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून पाणी वापर संस्था नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते. प्रत्येक जलाशयांतील काही पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीही करावी लागते.