20 हजार वर्षांपूर्वीच्या प्राण्यांचे अस्तित्व उलगडले
वणी,
तालुक्यातील जुगात व आपटी परिसरात वर्धा नदीच्या किनारी अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण Discovery of fossils जीवाश्मांचा शोध लागल्याने भूशास्त्र क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रा. सुरेश चोपणे यांनी केलेल्या संशोधनातून मागील वर्षी हत्तीचे जीवाश्म सापडल्यानंतर यावर्षी बायसन, हरिण, डुक्कर तसेच मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारे आढळून आली आहेत.
प्रा. चोपणे यांच्या माहितीनुसार, ही सर्व जीवाश्मे सुमारे 20 हजार वर्षांपूर्वीच्या प्लेइस्टोसिन (हिमयुगीन) कालखंडातील असून, त्या काळातील वन्यजीव आणि मानव जीवनाचा महत्त्वपूर्ण पुरावा मानल्या जात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अशा प्रकारची अलीकडील प्राण्यांची जीवाश्मे प्रथमच आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संशोधनातील महत्त्वपूर्ण निष्कर्ष
वर्धा नदीकाठच्या परिसरात सापडलेल्या जीवाश्मांमध्ये बायसनचे (गवा किंवा रानरेडा) प्रमाण अधिक असून, त्याशिवाय रानडुकराचे दात, हरिणांची हाडे आणि काही मानवी अवशेषही मिळाले आहेत. या ठिकाणीच पाषाणयुगीन मानवांनी वापरलेली अवजारे सापडल्याने त्या काळातील मानव वन्यजीवांची शिकार करत असल्याचे संकेत मिळतात.
हिमयुग आणि महापुराचा संबंध
सुमारे 20 हजार वर्षांपूर्वी जगात हिमयुग अस्तित्वात होते. त्यानंतर तापमानवाढ होऊन हिम वितळल्यामुळे मोठ्या प्रमाणात महापूर आला. या महापुरात अनेक प्राणी वाहून जाऊन नदीकाठच्या गाळात गाडले गेले आणि कालांतराने त्यांचे जीवाश्मांमध्ये रूपांतर झाले, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
वणी तालुका ‘भूशास्त्रीय खजिना’
Discovery of fossils वणी तालुका भूशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध मानला जात असून, येथे 200 कोटी वर्षांपासून ते 20 हजार वर्षांपर्यंतच्या विविध कालखंडातील जीवाश्म सापडले आहेत. यामध्ये 150 कोटी वर्षांपूर्वीचे स्ट्रोमॅटोलाइट, 20 कोटी वर्षांपूर्वीची वनस्पती जीवाश्मे, 6 कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोर अवशेष तसेच अलीकडील प्राण्यांची जीवाश्मे यांचा समावेश आहे.
संग्रहालयाची गरज अधोरेखित
सध्या सापडलेली सर्व जीवाश्मे प्रा. सुरेश चोपणे यांच्या रॉक म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आली आहेत. मात्र, या अमूल्य ठेव्याचे संवर्धन आणि अभ्यासासाठी शासकीय स्तरावर संग्रहालय उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
प्रा. चोपणे यांचे योगदान
1995 पासून भूशास्त्रीय संशोधन करणाèया प्रा. चोपणे यांनी चंद्रपूर व वणी परिसरात अनेक महत्त्वपूर्ण जीवाश्म शोधून काढले आहेत. त्यामध्ये प्राचीन स्ट्रोमॅटोलाइट, डायनासोर अवशेष, वृक्ष-वनस्पती जीवाश्म यांचा समावेश आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधनामुळे वणी तालुका राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करीत आहे.