अयानच्या मौजमस्तीच्या व्हिडीओची तपासणी

चार आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
परतवाडा फाईल्स
परतवाडा, 
paratwada-files : येथील लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयानच्या मौजमस्तीच्य व्हिडीओची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणातील चार आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. या कालावधीत आरोपींची आणखी सखोल चौकशी होणार आहे.
 

L 
 
सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अयान अहमद तन्वीर अहेमद, उजेर खान इकबाल खान, मो. साद मो. साबिर, तबरेज खान तसलीम खान या चार जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने २१ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आणखी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळवणे, डिजिटल पुरावे तपासणे तसेच गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. न्यायालयानेही या मुद्दांचा विचार करून २७ एप्रिलपर्यंत कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला.
 
 
तपासा दरम्यान काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर दिसणारे आभासी ऐश्वर्य आणि वास्तव यात मोठी दरी असल्याचे उघड होत आहे.
 
 
दरम्यान, अयानचा थार गाडी आणि चार आयफोनसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या गाडीबाबतही मोठा खुलासा झाला आहे. संबंधित काळ्या रंगाची थार ही परतवाड्यातील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान असून, पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. याबाबत राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख ओएलएक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून झाली होती. मोबाईल खरेदीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीतून अयानने स्वतःला ‘रील क्रिएटर’ असल्याचे सांगत गाडीसोबत व्हिडीओ शूट करण्याची परवानगी मागितली होती. ओळखीच्या नात्याने गाडी वापरू दिल्याचे आर्यनने स्पष्ट केले. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींकडून मिळणार्‍या माहितीनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.