सातारा,
alliance in Satara सातारा जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच साताऱ्यातील सभेत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी खालच्या पातळीचे राजकारण झाल्याचा आरोप केला होता आणि याचा हिशोब केला जाईल असा इशाराही दिला होता. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी संपूर्ण घडामोडी स्थानिक पातळीवरील असल्याचे स्पष्ट केले. भोसले यांनी सांगितले की, भाजपला जिल्हा परिषदेत अठ्ठावीस जागांचे स्पष्ट बहुमत मिळाले होते, मात्र तरीही काही जणांकडून जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला. युती म्हणून एकत्र काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली होती, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. इतर जिल्ह्यांमध्ये भिन्न मतभेद असतानाही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, तर साताऱ्यात तितकी तीव्र मतभिन्नता नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे सुरु
उपमुख्यमंत्री शिंदे हे आमचे नेते असून हा प्रश्न जिल्ह्यापुरताच मर्यादित होता आणि आता तो संपल्याचेही भोसले यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रिया शिंदे यांचे नाव पुढे करण्यात आले होते, कारण त्या भाजपशी संबंधित आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधी पक्षांतील काही सदस्य आमच्याकडे आले असताना त्यांना सांभाळण्यात अपयश आल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेला भाजपची भीती वाटते का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित करत राजकीय कोपरखळीही मारली. जिल्ह्यातील कामकाजाबाबत बोलताना त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, शालेय पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याशी संबंधित नकाशा वगळल्याच्या मुद्द्यावर बोलताना भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. छत्रपती आणि मराठा इतिहासाबाबत कोणतीही चुकीची बाब घडल्यास ती सहन केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री स्तरावर पोहोचली असून योग्य ती कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.