आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार्‍या त्रुट्या लवकरच दूर होणार

- पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा विश्वास

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
गोंदिया, 
ayushman-bharat-yojana : गोंदिया जिल्हा छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेलगतचा जिल्हा असल्याने या राज्यातील रुग्ण उपचार करण्यासाठी येथे येतात. हे रुग्ण भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतात, मात्र योजनेअंतर्गत या राज्यांतील रुग्णांना महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या इलाजाचा निधी मिळण्यास विलंब होत आहे, यातील त्रुट्या लवकरच दूर करण्यात येतील, यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा विषय लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे, जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले.
 
 
GOND
 
 
 
 
नियोजन भवन येथे सोमवार २० एप्रिल रोजी पार पडलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सनियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते. सभेला आ. राजकुमार बडोले, आ. विनोद अग्रवाल, माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. जायस्वाल, डॉ. जयंती पटले, डॉ. रोशन कानतोडे उपस्थित होते. पालकमंत्री नाईक म्हणाले की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आरोग्य विमा योजना आहेत. सद्या या दोन्ही योजना एकत्रितपणे राबविल्या जात आहेत. त्यालाच आता आयुष्मान भारत योजना असे नाव देण्यात आले आहे. गरीब आणि आर्थिकदृट्या दुर्बल कुटुंबांना गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता या एकत्रित योजनेअंतर्गत ज्यांनी आयुष्यमान कार्ड तयार केले आहे, त्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते. रुग्णालयात भरती झाल्यानंतरचा खर्च उदा. औषधे, तपासण्या, शस्त्रकिया या योजनेतून केला जात असून योजनेचे कार्ड तयार करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे सांगितले.