वर्धा,
bor-sanctuary : वन्यजीव विभागामार्फत बुद्ध पौर्णिमेच्या रात्री १ मे दुपारी ३ वाजतापासून ते २ मे च्या सकाळी ८ वाजतापर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रातील पाणवठ्यावर निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी २१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल ८२ निसर्गप्रेमींनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे.

मागीलवर्षी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला निसर्ग प्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी ६० पेक्षा जास्त निसर्ग प्रेमींनी अर्ज सादर केले होते. मचाणीची संख्या मर्यादित असल्यामुळे केवळ ३६ निसर्गप्रेमींना यामध्ये सहभागी होता आले. यंदा १ मे रोजी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामधील वनपरिक्षेत्र हिंगणी बफर, वनपरिक्षेत्र बांगडापूर बफर, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रामधील वनपरिक्षेत्र न्यू बोर अभयारण्य हिंगणी कोअर, वनपरिक्षेत्र बोरधरण कोअर, वनपरिक्षेत्र कवडस कोअर असे ५ वनपरिक्षेत्रातील ४४ मचाणींवर पाणस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे. निसर्गरम्य अनुभव घेण्यास इच्छुक व्यतीचे वय १८ वर्ष पूर्ण व ६० वर्षाच्या आत असावे. इच्छुक निसर्ग प्रेमी व्यतींनी सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २० ते २२ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत संकेतस्थळावरील गुगल फार्मवर अर्ज सादर करावे. २१ दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल ८२ निसर्गप्रेमींनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली असल्याची नोंद बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने घेतली आहे.