वर्धा,
break-on-child-marriage : खैरी येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव येथील अल्पवयीन बालिकेचा विवाह खैरी येथील २४ वर्षीय युवका सोबत ठरविण्यात आला होता. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासन व चाईल्ड हेल्पलाईनला मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित कुटुंबियांना पोलिस स्टेशन खरांगाना येथे बोलावून ग्रामपंचायत अधिकारी तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी संदीप खोडे यांच्या मार्फत पालकांकडून बालविवाह थांबविण्याबाबतचा जबाबनामा लिहून घेण्यात आला.
यावेळी सक्षम अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, अंगणवाडी सेविका मंगला भानसे, पोलिस पाटील मंगेश बावणे, चंदा नाखले, संतोष डोणे, माधुरी थूल, वैभव भांदककर उपस्थित होते. बालिका बाभूळगाव येथील असल्यामुळे तातडीने ग्रामपंचायत अधिकारी दीपा शिंदे याच्या सोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली व प्रतिबंधात्मक कार्यवाहीकरिता बालिकेच्या कुटुंबियांकडून बालविवाह थांबविण्याच्या जबाबनामा लिहून घेऊन त्यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. आशिष मोडक यांनी कुटुंबियांचे समुपदेशन केले.
बालिकेला बाल कल्याण समिती वर्धा येथे हजर करण्याचे पालकांना सूचना देण्यात आलेल्या असून पुढील कार्यवाही बाल कल्याण समिती वर्धा मार्फत करण्यात येईल. सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांच्या समन्वयाने पार पडली.