चंद्रपूर,
Credit card scam Chandrapur शहरात सायबर भामट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने एका 67 वर्षीय सेवानिवृत्त वृध्दाला 12 लाख 11 हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येथील सरकार नगरचे रहिवासी चंद्रसेन राजधर श्यामकुवर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण ‘बँक ऑफ इंडिया’चा कर्मचारी असल्याचे भासवून, तुम्ही पेन्शनधारक क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला आहे का, अशी विचारणा केली. भामट्याने मोठ्या खुबीने श्यामकुवर यांचा विश्वास संपादन केला. गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती आणि डेबिट कार्डचे डिटेल्स मिळवले. तुमचे व्हेरिफिकेशन 24 तासांत होईल आणि कार्ड घरी येईल, असे सांगून आरोपीने फोन ठेवला. मात्र, दुसर्या दिवशी संशय आल्याने श्यामकुवर यांनी बँकेत धाव घेतली. तेव्हा त्यांच्या खात्यातून पाच वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 12 लाख 11 हजार रुपये गायब झाल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. पीडिताने तातडीने सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधला. त्यानंतर रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.