- नागपूर विद्यापीठाचा जागतिक संशोधनात मोठा टप्पा
नागपूर,
'culture media' मानवी आरोग्य आणि सूक्ष्मजीवशास्त्र क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे अभिनव संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे साकारले असून, सूक्ष्मजीव संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या पोषण माध्यमांना स्वस्त, नैसर्गिक आणि शाश्वत पर्याय उपलब्ध झाला आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजीनियरिंग विभागातील संशोधकांनी वनस्पती-आधारित ‘कल्चर मीडिया’ विकसित करत जैविक संशोधन क्षेत्रात नवे पर्व सुरू केले आहे.
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. दयानंद पांडुरंग गोगले यांच्या नेतृत्वात हे संशोधन पूर्ण झाले. संशोधन पथकात डॉ. माधुरी ठाकरे, यजुर्वेद सेलोकर, तनेश्वरी हिरापुरे, डॉ. रीना मेश्राम, डॉ. राखी शंभरकर आणि डॉ. ललिता सावरकर यांचा समावेश आहे. ‘A Plant Based Culture Media Formulation for Cultivating Microorganisms’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाची मान्यता मिळाली आहे.
सध्याच्या काळात प्रयोगशाळांमध्ये Nutrient Agar आणि Luria-Bertani medium यांसारख्या महागड्या माध्यमांचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्था व उद्योगांना आर्थिक मर्यादा येतात. नव्या संशोधनात भारतीय धान्यांपासून तयार केलेले पोषण माध्यम वापरले असून ते किफायतशीर, सहज उपलब्ध आणि पर्यावरणपूरक आहे.
'culture media' या शोधामुळे पॅथॉलॉजिकल चाचण्या तसेच सूक्ष्मजीवांवर आधारित औषधनिर्मिती प्रक्रियेत मोठी बचत होण्याची शक्यता असून खर्च ५ ते ६ पट कमी होऊ शकतो. परिणामी, वैद्यकीय तपासण्या स्वस्त होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांचा अधिक अनुभव मिळणार आहे.
या संशोधनामुळे विज्ञान शिक्षणात समान संधी, आर्थिक शाश्वतता आणि ‘मेड-इन-इंडिया’ संकल्पनेला चालना मिळणार आहे. परकीय घटकांवरील अवलंबित्व कमी होऊन स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने या ऐतिहासिक यशाबद्दल संशोधकांचे कौतुक केले असून, हा शोध जागतिक स्तरावरही प्रभाव पाडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.