महिला खासदारांचा अपमान करणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध तक्रार

* खा. धानोरकरांची लोकसभा अध्यक्षांकडे धाव

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
pratibha-dhanorkar : खा. प्रतिभा धानोरकर यांनी, चंद्रपूर जिल्हा प्रशासनाविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. 20 एप्रिल रोजी आयोजित ‘राजमाता राणी हिराई जन्मोत्सव’ या शासकीय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकार्‍यांनी राज्य शिष्टाचाराच्या नियमांना धाब्यावर बसवून, एका महिला खासदाराचा आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.
 
 
PRATIBHA
 
 
 
या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या ‘ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स’नुसार खासदारांचा दर्जा व भाषण क्रम निश्चित असताना, प्रशासनाने पक्षपातीपणा दाखवला. खासदार महोदयांचे भाषण सुरू असतानाच आमदारांना वाजतगाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊन खासदारांना आपले भाषण थांबवावे लागले. हा प्रकार केवळ तांत्रिक चूक नसून, एका लोकप्रतिनिधीला सार्वजनिकरीत्या अपमानित करण्याचा कट असल्याचा आरोप खा. धानोरकर यांनी केला आहे.
 
 
जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित यंत्रणेने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम केल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव नसलेल्या आणि कोणतेही घटनात्मक पद धारण न करणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांचा मंचावरील वावर आणि हस्तक्षेपामुळे शासकीय निधीतून होणार्‍या या सोहळ्याचे रूपांतर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या खाजगी मेळाव्यात झाल्याचा आरोप खा. धानोरकर यांनी केला आहे.
 
 
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन हे प्रकरण तातडीने संसदेच्या ‘विशेषाधिकार समिती’कडे वर्ग करण्याची आग्रही मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. तसेच अधिकार्‍यांची सखोल चौकशी करून, त्यांच्यावर दंडात्मक व सेवाशर्तींनुसार कारवाई करावी, अशी मागणीही खा. धानोरकर यांनी पत्रात केली आहे.
 
लोकसभा अध्यक्षांना खुलासा देऊः जिल्हाधिकारी पंत
 
 
लोकसभा अध्यक्षांनी विचारणा केल्यास, यथायोग्य खुलासा त्यांच्याकडे पाठवला जाईल, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी तभाकडे दिले.